काही जणांच्या तोंडाला दुर्गंधी का असते?
हा अनुभव तुम्ही कधी तरी घेतलाच असेल. समोरच्याने बोलायला तोंड उघडावे आणि एकदम दुर्गंधी यावी. असे का बरे होते? सकाळी उठल्या-उठल्या दात घासलेले नसताना आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला दुर्गंध येईल. रात्रभर तोंड बंद असल्याने असा वास येतो; पण इतर वेळा मात्र निरोगी माणसाच्या तोंडाला दुर्गंधी येत नाही. तोंडाला दुर्गंधी येण्याची अनेक कारणे आहेत. दातांना कीड लागली असल्यास दुर्गंधी येते. हिरड्यांतून संसर्गामुळे पू येत असेल, तरी तोंडाला दुर्गंधी येते. तोंडाची अस्वच्छता, तोंड, घसा, जीभ यांना झालेला जंतूसंसर्ग; लाळग्रंथींचा जंतूसंसर्ग या सर्वांमुळे तोंडाला दुर्गंधी येते. या स्थानिक कारणांखेरीज शरीरातील इतर इंद्रियांच्या रोगांमुळेही तोंडाला विशिष्ट असे वास येतात. फुफ्फुसात झालेला पू, ब्रॉन्कीएटॅसीससारखा रोग यांमुळे दुर्गंधी येते. खूप धूम्रपान करणार्या व्यक्तींच्या तोंडाला दुर्गंधी येते. यकृताच्या गंभीर आजारात तोंडाला माशासारखा वास येतो. मूत्रपिंडाचे कार्य बंद पडल्यास तोंडाला अमोनियाप्रमाणे वास येतो. मधुमेहाच्या गुंतागुंतीमध्ये तोंडाला गोडसर फळांसारखा वास येतो. तोंडाला दुर्गंधी येण्याची कारणे आपण पाहिली, स्थानिक कारणांमुळे येणारी दुर्गंधी ही त्या भागातील जंतूसंसर्गामुळे असते तर फुफ्फ ुसाच्या, यकृताच्या वा मूत्रपिंडाच्या रोगांमुळे येणारी दुर्गंधी ही श्वासामधून येते. त्यामुळे अशा वेळी नुसते तोंड स्वच्छ ठेवून वा दात घासून ती दुर्गंधी कमी होणार नाही. त्यासाठी मूळ रोगावरच उपचार घ्यावे लागतील; पण सामान्यतः तोंडाला येणारी दुर्गंधी स्थानिक कारणांमुळेच असते व वैयक्तिक स्वच्छता ठेवल्याने ती कमी होऊ शकते.