क्रिकेट प्रशिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू

0
167

नगरच्या रेल्वे स्टेशन जवळील घटना; उड्डाणपुलाखाली रेल्वे मार्ग ओलांडताना अपघात

नगर – नगरमधील तरुण क्रिकेट प्रशिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१५) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नगरच्या रेल्वे स्टेशन जवळ घडली. राहुल शिवाजी लवंगे (वय २७, रा. न्यू आर्टस् कॉलेजच्या मागे, बालिकाश्रम रोड) असे मयताचे नाव आहे. मयत लवंगे हे क्रिकेट प्रशिक्षक असून ते दररोज सकाळी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ मैदानात सरावासाठी जात असत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि.१५) सकाळीही ते सायकलवर गेले होते. उड्डाणपुलाखाली रेल्वे मार्ग ओलांडत असताना समोरून अचानक रेल्वे गाडी आली. त्यांना ती दिसली नसावी. या रेल्वे गाडीची धडक बसून ते गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मयत लवंगे हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ असा परिवार आहे. त्यांचे शिक्षण एम.एस.सी. बी.पी. एड झालेले होते. त्यांची स्वतःची पी.आर. क्रिकेट अ‍ॅकॅडमी होती. केडगावच्या लिंक रोडवरील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये ते मुख्य क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते विविध जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धेत खेळलेले होते. त्यांचे वडील शिवाजी लवंगे हे न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. या अपघाताबाबत लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.