केडगावमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने लावला दुसरा पिंजरा

0
44

लिंक रोडवरील गायके मळा परिसरात कार्यवाही 

नगर – केडगाव परिसरात असलेल्या लिंक रोड वर गायके मळ्याजवळ मंगळवारी (दि.१२) रात्री ८.१५ च्या सुमारास एका मोटारसायकल स्वाराला पुन्हा एक बिबट्या दिसला होता. रस्त्याच्या खाली असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले होते. या परिसरात वनविभागाच्या पथकाने पाहणी करत सदर ठसे बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट करत या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. या पूर्वीही बायपास रोड वर असलेल्या पवार मळा परिसरात एक पिंजरा लावण्यात आलेला आहे. केडगाव परिसर व केडगाव-निंबळक बायपास रोडवर तसेच लिंक रोड वर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. मागील आठवड्यात सायंकाळच्या सुमारास बायपास रोड वर नव्याने होत असलेल्या टोल नायाजवळ दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने स्थानिक लोक हादरले आहेत. मागील २४-२५ दिवसांपासून केडगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अंबिकानगर परिसरातून बिबट्याला मोठ्या महत्प्रयासानंतर ताब्यात घेताना वनविभागाची दमछाक झाली होती. त्यानंतर मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास केडगाव निंबळक बायपास रोडवरील नेप्ती उपबाजार समिती जवळील उड्डाणपूल ते नव्याने झालेल्या टोलनाका परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनतर दुसर्‍या दिवशी सकाळी भूषणनगर लिंक रोड परिसरातील गायके मळ्यातील विहीरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळला होता. त्यानंतर पुन्हा नव्याने याच परीसरात दोन बिबटे दिसल्यामुळे या परिसरातील रहिवासी पुरते हादरले आहेत. अनेकांनी सकाळी व सायंकाळी व्यायामाला, वॉकिंगला जायचेही बंद केले आहे.

बिबट्याची ही दहशत कायम असताना मंगळवारी (दि.१२) रात्री ८.१५ च्या सुमारास लिंक रोड वर गायके मळ्याजवळ मोटारसायकलवर चाललेल्या एका नागरिकाला मोटारसायकलच्या उजेडात एका बिबट्या रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला. त्याने मोठ्याने हॉर्न वाजवल्यावर तो बिबट्या त्याच्या समोर रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या उसाच्या शेतात गेल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर त्याने परिसरातील नागरिकांना ही माहिती दिल्यावर नागरिक तेथे जमा झाले त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही, मात्र रस्त्यापासून शेतापर्यंत असलेल्या मातीत बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले होते. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. लिंक रोड परिसरात बिबट्या दिसल्यावर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अजित कोतकर व पदाधिकार्‍यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेवून या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१४) दुपारी या भागात पिंजरा लावला आहे. त्यामुळे केडगाव परिसरात आता २ पिंजरे लावण्यात आले आहेत. यावेळी अजित कोतकर, दिपक मगर, अक्षय गायके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.