नगर – शेतकर्याचे घर दिवसा फोडून सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, पाच भाराचे चांदीचे दागिने असा ५७ हजार ७०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरून नेला. नगर तालुयातील घोसपुरी शिवारात मोळ वस्तीवर सोमवारी (दि. ११) दुपारी दीड ते साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. १३) रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप सुदाम झरेकर (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे घोसपुरी शिवारात मोळ वस्तीवर घर आहे. त्यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता कुलूप लावून घर बंद केले होते. त्यानंतर चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले दागिने त्यामध्ये एक तोळ्याचे सोन्याचे गंठण, सात ग्रॅमचा सर, तीन ग्रॅमचे कानातील फुले, साडेतीन ग्रॅमचे कानातील झुंबे, पाच ग्रॅमचे डोरले, एक ग्रॅमची अंगठी व पाच भाराचे चांदीचे कडे असा ५७ हजार ७०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. फिर्यादी दुपारी साडेतीन वाजता घरी आल्यानंतर सदरचा प्रकार त्यांच्या लक्ष्यात आला. फिर्यादी यांनी बुधवारी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार वनवे करत आहेत.