सर्जेपुरा परिसरातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

0
53

नगर – सर्जेपुरा परिसरातील मुस्कान एन्टरप्रायझेसच्या तळघरात सुरू असलेल्या एमएच १६ हुक्का पार्लरवर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने बुधवारी (दि. १३) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजु जाधव यांच्या फिर्यादीवरून हुक्का पार्लर चालविणारा कृष्णा इंगळे (पूर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार झाला आहे. दरम्यान पोलिसांनी सदर ठिकाणाहून तंबाखूजन्य पदार्थ, काचेचे पॉट, चिलीम असा १४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्जेपुरा परिसरात इंगळे हेल्थ लबच्या समोर मुस्कान एन्टरप्रायझेसच्या तळघरात कृष्णा इंगळे हा एमएच १६ नावाचा हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक भारती यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, सागर व्दारके यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने बुधवारी सायंकाळी सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच चालक कृष्णा इंगळे पसार झाला. पोलिसांनी पंचासमक्ष हुक्का पार्लरमधील सर्व साहित्य जप्त करून कृष्णा इंगळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.