बहुजन मुक्ती पार्टीनी केली रावसाहेब काळे यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा

0
47

 

New Doc 11-30-2023 11.18(1)

नगर – बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अहम दनगर लोकसभा दक्षिणच्या उमेदवारीसाठी रावसाहेब काळे पाटील यांची नावाची घोषणा करण्यात आली. सावेडी, श्रीराम चौक येथे झालेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीत एकमताने काळे यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आला. बामसेफच्या सर्व आघाडींनी श्री. काळे यांना पाठिंबा दर्शविला. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी इम्पाचे जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, भारतीय ख्रिश्चन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पास्टर अजय देठे, भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पगारे, मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालीद खान, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, महिला जिल्हाध्यक्षा तनिज शेख, वहाडणे, जाधव, संजय शिंदे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते. शिवाजी भोसले म्हणाले की, नागरिकांसमोर शहराच्या नामांतरासारखे खोटे प्रश्न उभे करून दिशाभूल केली जात आहे. बेरोजगारी, महागाई, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी उत्तर नसल्याने नागरिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करुन नामांतराचे मुद्दे घेतले जात आहे. बहुजन मुक्ती पार्टी संविधानाच्या विचाराने कार्य करत आहे. देशात व राज्यात महापुरुषांचे विचार संपवून हुकूमशाही सुरू आहे. काही समाजाला टार्गेट करून स्वतःच्या फायद्यासाठी असमानता पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भास्कर रणनवरे म्हणाले की, देशात विरोधी पक्ष नाही, भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या बाजू आहेत. देशात अनागोंदी सुरु असून, ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोयात आली आहे.

नागरिकांसमोर शहराच्या नामांतरासारखे खोटे प्रश्न उभे करून दिशाभूल : शिवाजी भोसले

राज्यात मराठा व ओबीसी समाजात भांडण लावून राजकीय फायदा घेण्याचे काम सुरु असल्याचे स्पष्ट केले. तर पीडित, शोषित व कामगार वर्गाची चळवळ चालविणारे व सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी निस्वार्थपणे काम करणारे काळे यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले. खालीद खान यांनी मुस्लिम आघाडीच्या वतीने काळे यांना पूर्णत: पाठिंबा राहणार असून, मुस्लिम समाज देखील त्यांच्या पाठिशी उभे राहणार आहे. शहराचे नाव मुस्लिम व्यक्तीचे असल्याने त्याला जातीयवादी शक्तींना बदलण्याचा घाट घातला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी मंडळी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पास्टर अजय देठे यांनी संपूर्ण स्वातंत्र्य, न्याय, समता व बंधुता निर्माण करण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार असून, देशात अघोषित हुकुमशाही सुरु असल्याचे सांगितले. रावसाहेब काळे म्हणाले की, लष्करात सेवा केल्याने नेहमीच देशसेवेची तळमळ राहिली आहे. देशाच्या सेवेसाठी ही उमेदवारी स्विकारली आहे. देशात विरोधी पक्ष व सत्ताधारी यांची मिलीजुळी सरकार आहे. सर्व भ्रष्टाचारी नेत्यांनी भाजपात दाखल होऊन स्वतःची शुद्धी करून घेतली आहे. ईडीची भीती दाखवून अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भांडवलदाराचे सरकार सत्तेवर असून, कामगार सर्वसामान्यांचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.