नगर – लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागण्याआधी शेतकर्यांना सर्व देणी मिळावीत, अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगाम २०२३ -२४ मध्ये खूपच कमी पाऊस पडल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे कबूल करून जाहीर केलेले आहे. मात्र दुष्काळाबाबतचे अनुदान शेतकर्यांना प्राप्त झालेले नाही. यावर्षी कोरडा तर त्याआधी तीन वर्ष ओला दुष्काळ असुनही शेतकर्यांना पिक विमा मिळालेला नाही. ज्या शेतकर्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्ज घेतले आणि वेळेवर त्याची परतफेड केली त्यांना ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे शासनाने ठरविले होते. मात्र अनेक शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्व सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचे शासनाने ठरविले आहे. मात्र शेतकर्यांचे विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि जिल्हा सहकारी बँकेमार्फत घेतले गेलेला व्याज परतावा मिळालेला नाही. नाबार्ड मार्फत मिळणारे व्याज अनुदान पशुपालकांना मिळालेले नाही. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनेक शेतकर्यांचे अनुदान अद्याप आलेले नाही. तसेच बर्याच शेतकर्यांची नावे योजनेतून वगळली गेलेली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी शासनाने सर्व देणे द्यावीत अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी, राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, सुनील टाक, वीरबहादुर प्रजापती, बबलू खोसला व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.