शहरात रंगला बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो

0
21

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जॅझ मेकओव्हरने राबविला उपक्रम

नगर – जॅझ मेकओव्हर व दिशा फाउंडेशन आयोजित बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड शो शहरात रंगला होता. यामध्ये जिल्ह्यातील मेकअप आर्टिस्टने सहभाग नोंदवून सौंदर्य फुलविणार्‍या कलाकृतीचे सादरीकरण केले. महिला दिनानिमित्त टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री ऋतुजा बागवे व जॅझ मेकओव्हरच्या संचालिका जास्मिन शेख यांच्या हस्ते महिला मेकअप आर्टिस्टना अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय आर्टिस्ट कविता सरोदे, सविता मोरे आणि विद्या खोत यांनी मेकअपसाठी असलेले अद्यावत तंत्रज्ञान व सौंदर्य प्रसाधनावर उपस्थित महिला व युवतींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातून नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सध्या फॅशनचे युग असून मेकअप आर्टिस्टला चांगली मागणी आहे. युवतींना करिअरच्या दृष्टीकोनाने या क्षेत्रात उत्तम संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास सुमारे पाचशे महिला उपस्थित होत्या. मेकअप आर्टिस्टना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जास्मिन शेख यांनी शहरात राबविलेल्या उपक्रमाबद्दल सर्व मेकअप आर्टिस्टने त्यांचे आभार मानले व उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.