माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व टोळी विरोधात १ हजार पानांचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल

0
33

नगर – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेला माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळी विरोधात अखेर ‘मोक्का’ कलमानुसार विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सुमारे एक हजार पानांचे हे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सुरज ऊर्फ मिया राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे, अरूण अशोक पवार, राजू भास्कर फुलारी यांच्यावर खुनाचा दोष ठेवण्यात आला आहे. या टोळीने सावेडी उपनगरातील एकविरा चौकात १५ जुलै २०२३ च्या रात्री अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला केला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान शिंदे टोळी विरोधात ‘मोक्का’ लावण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांनी ‘मोक्का’चे वाढीव कलम लावण्यास मंजूर दिली होती. ‘मोक्का’चे वाढीव कलम लावल्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक भारती यांनी करून पुरवणी दोषारोपपत्र तयार केले. ते विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यासाठी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांची परवानगी आवश्यक असते. त्यांनी सोमवारी (दि. ११) परवानगी दिल्याने उपअधीक्षक भारती यांनी विशेष मोक्का न्यायालयात बुधवारी (दि. १३) दोषारोपपत्र दाखल केले आहे.