बाजारपेठेत दिवसभर कचऱ्याचे ढिगारे पडून राहत असल्याने व्यापारी, व्यावसायिक त्रस्त

0
81

नगर – शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून नियमितपणे कचरा संकलन सुरू आहे. तथापि घंटागाड्यांचे चालक आपल्या सोयीनुसार कचर्‍याचे संकलन करत असल्याने काही भागात दिवसभर कचरा पडून राहतो. विशेषतः बाजारपेठेत दुकाने सुरू होण्यापूर्वी कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी, व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घेऊन बाजारपेठेतील कचरा सकाळच्या वेळेत उचलण्याबाबत घंटागाडी चालकांना सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. शहरात सफाई कर्मचार्‍यांमार्फत दैनंदिन सफाईचे कामकाज केले जाते. झाडलोट करून रस्ते, गल्लीबोळातील कचर्‍याचे ठिकठिकाणी संकलन केले जाते. सदर कचर्‍याचे ढिगारे घंटागाडी, ट्रॅटरच्या माध्यमातून उचलला जातो. मात्र सकाळी गोळा केलेला कचरा दुपारी उशिरापर्यंत उचलला जात नाही. त्यामुळे आसपासच्या व्यापारी, व्यावसायिकांसह रहिवासी आणि दुकानात येणार्‍या ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. आडतेबाजार या गजबजलेल्या बाजारपेठेत ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढिगारे दुपारी उशिरापर्यंत तसेच असतात.

येथील ‘दुल्लभदास हरिदास’ या किराणा दुकानासमोर तर कचर्‍याचा ढिगारा दुपारपर्यंत तसाच पडून असतो. या कचर्‍यात प्लॅस्टिक, कागद तसेच ओला कचरा आणि काहीवेळा मेलेल्या प्राण्यांचे अवशेषही असतात. सदर कचरा सकाळच्या वेळेत उचलला जात नसल्याने या दुकानासमोर सर्वत्र अस्वच्छता, घाण पसरते. तसेच दुर्गंधीही सुटते. दुकाने ११-१२ वा.च्या नंतर उघडली तरी हा कचरा तसाच पडून असतो. त्यामुळे दुकानात येणारे ग्राहकही त्रस्त झाले आहेत. परिसरातील व्यापारी, व्यावसायिक या घाणीच्या साम्राज्यामुळे त्रासात असून कचरा सकाळी दुकाने सुरू होण्यापूर्वी उचलण्याचे सांगूनही घंटागाडी चालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रसंगी व्यापारी, व्यावसायिकांनाच अरेरावी केली जाते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन बाजार पेठेतील कचरा संकलन सकाळी लवकरात लवकर करण्याबाबत संबंधित ठेकेदार संस्था आणि घंटागाडी, कचरा वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना सूचना कराव्यात, अशी मागणी बाजारपेठेतून होत आहे.