स्व.अनिल राठोडांशी गद्दारी करणाऱ्यांना ‘नगर दक्षिणेतील जनता’ धडा शिकवणार

0
43

नगर – भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या कालच जाहीर झालेल्या यादीमध्ये नगर दक्षिणेतून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून स्व. अनिल राठोडांशी गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवणार अशी पोस्ट केली आहे. जवळपास हजार लोकांनी ही पोस्ट गुरुवार सकाळपर्यंत लाईक केली आहे, अशी माहिती काळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. निलेश लंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे लंके उमेदवार झाल्यास विखे विरुद्ध लंके असा सामना रंगणार अशा चर्चा झडू लागल्या आहेत. मागील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला अनिल राठोड यांच्या विरोधात सुजय विखे यांनी केलेल्या कामाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस नगर शहरात सज्ज असल्याचा संदेश काळे यांनी दिला आहे. आता हीच वेळ आली आहे गद्दारीचा बदला प्रत्येक शिवसैनिक घेणार म्हणजे घेणारच. आम्ही तर वाटच बघत होतो बदला घ्यायची. हीच खरी अनिलभैय्यांना श्रध्दांजली आसणार, असे महाविकास आघाडीचे समर्थक म्हणत आहेत.

त्यावर महायुतीच्या समर्थकांकडून उड्डाणपूल, बायपासचा विकास पाहून मतदान करा. नगरकरांनी उगाच कोणाच्या नादी लागून विरोध करू नका, असे आवाहन केले जात आहे. त्यावर, सत्तर वर्षात जे अनुभव लोकांनी नाही घेतले ते सगळे अनुभव गेल्या दहा वर्षात लोकांनी अनुभवले. गेल्या निवडणुकीत झालेली घोडचूक या निवडणुकीत नक्कीच दुरुस्त करणार. यावेळी जुमलेबाज पार्टीला आणि त्यांच्या लबाड अशिक्षित सरदाराला हद्दपारच करणार, असे म्हणत त्याला महाविकास आघाडीचे समर्थक प्रत्युत्तर देत असल्याचे काळे म्हणाले. देशात भाजप विरोधात लाट आहे. नगर दक्षिणेत यावेळी परिवर्तन अटळ आहे. विधिमंडळ काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षांच्या काळात नगर शहरात काँग्रेसने उत्तम प्रकारे पक्ष संघटन मजबूत केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी थोरात यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेचा खासदार महाविकास आघाडीचाच होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. विशेषत: नगर शहरात ज्यांनी स्व. अनिल राठोड यांच्याशी गद्दारी केली त्यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते जीवाचं रान करणार असल्याचे किरण काळे यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना आव्हान दिले आहे.