नगर शहरासाठी आणखी ८५ कोटी तर भिंगारला ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

0
39

नगर – नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी राज्य शासनाने नव्याने ८५ कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर निधीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे नगर शहरासह भिंगारलाही विकासकामांचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने, क्रीडांगणे, चौक शुशोभीकरण तसेच अन्य विकासकामे होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावा भरीव विकासनिधी देवून नगर शहराच्या विकासाची नव्याने पायाभरणी केली आहे, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आपण सुरु केले आहे. विकासकामे करताना सर्वात मोठी अडचण निधीची असते. गेल्या काही काळात वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून नगर शहरासाठी इतिहासातील सर्वात मोठा निधी खेचून आणण्यात मला यश मिळाले आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे आपल्या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री निधी मंजुर करीत आहेत. नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी नुकताच पहिल्या टप्प्यातील १५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नगर शहरात येत्या काळात जवळपास २३५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत. भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही आपण खरा करून दाखविला आहे. भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडून तब्बल ९ कोटींचा भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे, असे आ. जगताप म्हणाले. आ. जगतापांचा राजकीय निर्णय नगरसाठी लाभदायी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली. त्यावेळी आ.संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला निर्णय नगरसाठी लाभकारक ठरला आहे. पवारांनी आ.जगताप यांच्या प्रस्तावानुसार व पाठपुरावा यामुळे नगर शहराच्या विकासासाठी निधी देताना हात सैल सोडले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला खर्‍या अर्थाने चालना मिळाली आहे. भिंगारकरांना दिलेला शब्द पाळला भिंगार शहर छावणी परिषदेकडे असल्याने कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खूप काथ्याकूट करावी लागते.

विकास करताना विविध परवानग्या मिळवताना थेट दिल्लीपर्यंत विषय जातो. अशावेळी भिंगारमध्ये काम करताना प्रचंड मेहनत करावी लागते. मी भिंगारकरांना शब्द दिलेला असल्याने तो पाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आमदार निधीतून भिंगारमध्ये अनेक विकासकामे केली. आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतया मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदललेला दिसेल, असा विश्वास आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, निखिल वारे, बाळासाहेब बारस्कर, अजिंय बोरकर, मुजाहिद कुरेशी, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. अहमदनगरच्या नामांतराचे आ. संग्राम जगतापांकडून स्वागत अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना घोषणा केली होती. त्यानंतर त्याबाबत नगर विकास खात्याकडून प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सदरचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे आल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची मागणी केली होती. त्यानंतर ना. पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सदरचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन तो मंजूर करुन घोषणा करण्यात आली. आता या नामांतरास केंद्र सरकारची मंजूरी मिळाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल, असे स्पष्ट करत नामांतराचे स्वागत असून त्याबाबत शासनाचे संबंधित सर्व यंत्रणेचे आभार व्यक्त करतो, असे आ. संग्राम जगताप यांनी भावना व्यक्त केल्या.