आजारानंतर केस का गळतात?

0
45

आजारानंतर केस का गळतात?

केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते. तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणार्‍या क्वाशिओरकॉर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.