७० व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या ‘भिडू बोधचिन्हा’चे अनावरण

0
48

नगर – अहमदनगर येथे होणार्‍या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या ’भिडू’ या बोध चिन्हांचे अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे, राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, खजिनदार मंगल पांडे, राज्य उपाध्यक्ष शशिकांत गाडे, उपाध्यक्ष जयंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा २१ ते २४ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखीखाली खेळाडू सराव करीत आहेत. या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमाचे लक्ष लागलेले आहे. यावेळी बोलताना राज्य शासनाच्या आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात नगरचा दबदबा आहे. याच वाडिया पार्क मैदानात आपण क्रिकेट चा सराव करून राष्ट्रीय पातळीवर पोहोचलो. प्रा.गाडे याच मैदानात कबड्डीचा सराव करीत. सी ए अशोक पितळे राज्य खो खो संघाचे कर्णधार होते. राष्ट्रीय कबड्डी संघात, प्रो कबड्डी यामध्ये नगरचे खेळाडू चांगली कामगीरी करीत आहेत.

ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान नगरला मिळाला हे अभिमानास्पद आहे. या अभिमानाला साजेशी अशी कामगिरी राज्याचा संघ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले भिडू हे बोधचिन्ह काळवीट या प्राण्यापासून प्रेरणा घेऊन घेण्यात आले आहे. आपल्या अहमदनगरला कर्जत येथे रेहेकुरी काळवीट अभयारण्याची देणगी लाभलेली आहे. काळवीट हा हरीण जातीतील प्राणी असून तो चपळ चलाख आणि तेज असतो. तसेच गुण कबड्डी हा खेळ खेळणार्‍या खेळाडूंमध्ये असतात. तेव्हा या स्पर्धेत बोधचिन्ह असलेल्या भिडू या काळवीटाच्या प्रतीकांची प्रेरणा सर्वांना मिळेल आणि भिडू सर्वांच्या कायम आठवणीत राहील अशी अपेक्षा आपल्या भाषणात बोलताना उपाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी व्यक्त केली. यावेळी पंकज जावळे यांचे भाषण झाले. राज्य कबड्डी संघाचे सह प्रशिक्षक दादासो आव्हाड, क्रीडा प्रशिक्षक खुरांगे, छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते खेळाडू अजय पवार, प्रकाश बोरुडे, प्रा. भास्करराव कुह्राड, कबड्डी संघाचे सह सेक्रेटरी विजय मिस्कीन, एम. पी. कचरे आदी यावेळी उपस्थित होते. लवकरच या ठिकाणी प्रशिक्षण शिबीर पूर्ण होणार असून राज्याचा कबड्डी संघ जाहीर होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.