केंद्राप्रमाणे राज्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात यावा

0
101

शासन आदेश निर्गमीत करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य शासनाकडे मागणी

नगर – केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, कर्मचारी यांना १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिर्लेकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती व माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण व क्रीडा सचिवांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचार्‍यांना १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करणे आवश्यक आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे सदर लाभ मिळण्यासाठी राज्यातील कर्मचारीसुद्धा शासन निर्णयाची आशेने वाट पाहत असल्याचे म्हंटले आहे. केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबतचा शासन आदेश आचारसंहितेपूर्वी निर्गमित करून सदर आर्थिक लाभ मिळवून देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.