घरातील महिला आनंदी निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ चांगले राहते : डॉ. राहुल त्रिमुखे

0
23

वीरशैव संत श्री कक्कया महाराज जयंती व महिला दिन आरोग्य शिबिराने साजरा

नगर – घरातील महिला आनंदी निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ चांगले राहते. महिलांनी इतर कामकाजासह स्वतःचे आरोग्य सांभाळण्याची गरज आहे. दररोज पंधरा ते वीस मिनिट व्यायाम करणे गरजेचे आहे. तणावपूर्ण जीवनशैलीमुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. राहुल त्रिमुखे यांनी स्पष्ट केले. वीरशैव (ढोर) समाज विकास मंडळ यांच्या वतीने वीरशैव संत श्री कक्कय्या महाराज जयंती उत्सव व जागतिक महिला दिन आरोग्य शिबिराने साजरा करण्यात आला. या शिबिरास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला. यावेळी महिला वर्गाची आरोग्य तपासणी करुन त्यांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बुरुडगाव रोड येथील त्रिमुखे गोडावून हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात वीरशैव संत श्री कक्कया महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल त्रिमुखे, एमडी मेडिसीन डॉ. राहुल बोर्‍हाडे, दंतरोग तज्ञ डॉ. दिपक केळगंद्रे, डॉ. विद्याधर त्र्यंबके, नायब तहसीलदार छाया चौधरी, लाला त्र्यंबके, संस्थेचे अध्यक्ष रमेश त्रिमुखे, उपाध्यक्ष बाबासाहेब त्रिंबके, सचिव प्रकाश कोकणे, अ‍ॅड. मनिषा शिंदे, सुभाष बोराडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. राहुल बोराडे म्हणाले की, तंत्रज्ञान युगातील पिढी मोबाईलमध्ये अडकत असल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवत आहे.

धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र वेळोवेळी तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतो. महागाईच्या काळात सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर गरजेचे बनले असल्याचे त्यांनी सांगितले. रमेश त्रिमुखे म्हणाले की, समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून, समाजात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांचा खर्च पेलवत नाही. त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. दिपक केळगंद्रे यांनी वेळोवेळी दांताची निगा राखणे हे आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचे आहे. नियमितपणे तपासणी केल्यास दातांचे विकार टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरात ११४ ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करुन त्यांना निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी किशोर भालशंकर, अनिल त्रिमुखे, संजय कवडे, प्रशांत डहाके, राजू कोकणे, संजय खरटमल, सुरेंद्र बोराडे, गणेश शिंदे, ओमप्रकाश कवडे, गणेश नारायणे, प्रविण त्र्यंबके, सुशीला त्रिंबके, इंदुमती शिंदे, सुभाषराव त्रिमुखे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.