पायी जात असलेल्या वृद्ध महिलेचे अपहरण करून लुटण्याचा प्रयत्न

0
45

नागरिकांनी ३ महिलांसह वाहनचालकाला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – रस्त्याने पायी शेताकडे चाललेल्या वृद्ध महिलेला एका कारमधून आलेल्या ३ महिला व वाहनचालकाने वाहनात बसवून तिला मारहाण करत तिच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र सदर वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने काही नागरिकांनी सदर वाहन अडवून त्यातील ३ महिला व वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवारी (दि.११) सकाळी १०.३० च्या सुमारास नगर तालुयातील चास ते भोयरे पठार रोड वर घडली. नितीन बाबु भोसले (वय २८), सुरेखा बाबु भोसले (वय ६५), सुषमा बापू चव्हाण (वय २३), नमिता पिंटू पवार (वय ३५, सर्व राहणार सोलापूर जिल्हा) असे या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर तालुयातील चास गावात अकोळनेर रोडला राहणार्‍या अलका दत्तात्रय कार्ले (वय ६५) या सोमवारी सकाळी चास ते भोयरे पठार रोडने चास गावच्या शिवारात असलेल्या गाडेकर मळा येथील शेतात चालल्या होत्या. त्यांच्या पाठीमागून एक क्विड कार आली. त्या कारमध्ये ३ महिला व चालक असे चौघे होते. त्यांनी गाडी थांबवत कार्ले यांना कुठे चालल्या आजी, अशी विचारणा करत चला आम्ही सोडतो तुम्हाला असे म्हणून त्यांना कार मध्ये बसवले. त्यांना सीट बेल्ट लावायला सांगितल्यावर त्या खाली वाकल्या तेवढ्यात एका महिलेने त्यांच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रतिकार करायला सुरुवात केली. त्यावेळी कार मधील तिन्ही महिलांनी त्यांना मारहाण करत कारच्या खाली ढकलून दिले. त्यावेळी कार्ले यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला.

तो ऐकून त्या रस्त्याने जाणार्‍या दोन मोटारसायकल स्वारांनी कारचा पाठलाग करत कारला मोटारसायकली आडव्या लावून ती थांबवली. या दरम्यान तेथे अजून काही नागरिक जमा झाले. त्यावेळी कार मधील महिला शेतात पळू लागल्या. नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. चास बीट मध्ये कार्यरत असलेले पोलिस अंमलदार जगदीश जंबे त्यावेळी चास मध्येच होते. त्यांनी तातडीने तेथे जावून या चौघांना ताब्यात घेतले. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग हे ही पथकासह तेथे दाखल झाले. पोलिस पथकाने चारही आरोपी व गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेतली. या प्रकरणी या चारही आरोपींवर अलका दत्तात्रय कार्ले यांच्या फिर्यादी वरून भा.दं. वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रणजीत मारग हे करत असून त्यांनी या आरोपींना मंगळवारी (दि.१२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.