महेश नागरी पतसंस्थेसह जिल्ह्यातील ३८ संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुधारित आदेश जारी
नगर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत स्थगित केल्या आहेत. तथापि सदर शासन आदेशात नामनिर्देशनचा टप्पा सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेशित केले होते. सदर आदेशाबाबत शासनाने ६ मार्च रोजी सुधारित परिपत्रक काढून नामनिर्देशनचा टप्पा सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. नामनिर्देशनचा टप्पा सुरू झालेल्या संस्था हे वाय वगळण्याबाबत आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३१ मे पर्यंत लांबणीवर पडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शयता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २८ फेब्रुवारी रोजी आदेश काढत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणार्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत.
तथापि या आदेशात नामनिर्देशनचा टप्पा सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे या टप्प्यातील बहुतांश संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होता. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय समीकरणेही बदलण्याची शयता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर शासनाने नामनिर्देशनचा टप्पा सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली असून, या सुधारित आदेशामुळे आता राज्यातील अ, ब, क, ड या वर्गातील सर्वच संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेसह एकूण ३८ संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये क वर्गातील ११ संस्थांचा नामनिर्देशनचा टप्पा तर २३ संस्थांचा माघारीचा टप्पा सुरू होता. ब वर्गातील ४ संस्थांचा मतदानाचा टप्पा सुरू होता. तथापि सदर शासन आदेशामुळे या सर्व ३८ संस्थांच्या निवडणुका ३१ मे पर्यंत लांबणीवर पडल्या आहेत.