माळीवाडा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करणार

0
97

ग्राहक मार्गदर्शन संस्थेचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा

नगर – शहरातील माळीवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचे काम मागील १५ दिवसांपासून चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरून चालावे लागते. वाहतूक कोंडी तसेच विस्कळीत वाहतुकीकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांना, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी याबाबत तातडीने उपाययोजना करून वाहतूक कोंडीची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक मार्गदर्शन संस्थेने दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे अल्लीउद्दीन पठाण व विष्णु आंबेकर यांनी म्हटले आहे की, माळीवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक नेहमीच विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

माळीवाडा येथून येणारी वाहने बंद करण्यात यावीत व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माळीवाडा मार्ग चालू ठेवावा. जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत इन गेटमधून एस.टी. बंद करण्यात यावी. एएमटी बसथांबा भिंगारवाला पेट्रोल पंपासमोर ठेवण्यात यावा. जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही. माळीवाडा येथे व चौकात २ वाहतूक पोलिस नेमण्यात यावेत. सदर वाहतूक पोलिस गैरहजर असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितास सूचना देण्यात याव्यात आदी मागण्या संस्थेच्यावतीने करण्यात आल्या असून, त्याबाबत तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी एस. वाय. पाचारणे, दत्ता वामन, शंकर विघावे, अभय पतंगे, शांताराम पाचारणे आदी उपस्थित होते.