जैन साधू-साध्वींसह वारकऱ्यांना पायी विहारासाठी राज्यातील महामार्गांलगत ‘पादचारी मार्ग’ बांधावा

0
35

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे इंजिनिअर यश शहा यांची निवेदनाद्वारे मागणी

नगर – जैन साधु साध्वी गुरूभगवंत तसेच वारकरी बांधव हे कायम पायी विहार, पदभ्रमण एका गावातून दुसर्‍या गावात संपूर्ण भारतात करत असतात. सध्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रोड अ‍ॅसीडेंटमध्ये जैन साधू भगवंत वीरगतीला प्राप्त झाल्याच्या दुःखद घटना घडल्या आहेत. भविष्यात असे प्रकार होऊ नये, याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर आले असताना त्यांची मिशन सेफ विहार संस्थापक तसेच अल्पसंख्यांक समिती उपप्रमुख, अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघ या नात्याने इंजी.यश प्रमोद शहा यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली व सकल जैन समाजाच्या वतीने विहार प्रश्नासंदर्भात निवेदन दिले. नगर-पुणे महामार्ग तसेच अहमदनगर शहरातून जाणारे विविध महामार्ग व इतर महाराष्ट्रात नव्याने बांधण्यात येणार्‍या महामार्गांमध्ये पायी विहार पदभ्रमण करण्यासाठीचा वेगळा पादचारी मार्ग बांधण्यात यावा, अशा सूचना महामार्ग विभागाला कराव्यात.

डिझाईन बनवताना याचा परिपूर्ण विचार व्हावा. गडकरी नेहमीच नवनवीन चांगल्या संकल्पना कायमच प्रत्यक्षात आणत असतात. महाराष्ट्रात देखील ही कल्पना प्रत्यक्षात आणावी, ही सकारात्मक अपेक्षा सकल जैन समाज व वारकरी बांधवांनी केली आहे. आपण ती पूर्ण करावी, अशी आशा यश शहा यांनी व्यत केली. शहा यांच्याकडून देण्यात आलेले निवेदन कॉपी स्वीकार करताना याबाबत योग्यतो विचार केला जाईल, असा सकारात्मक प्रतिसाद यावेळी ना. गडकरी यांनी दिला. तसेच यावेळी उपस्थित गोशाळा संचालकांना आदी जिन ट्रस्टमार्फत गोमाता सेवेसाठी देण्यात आलेल्या चेकचे त्यांच्या हस्ते संचालकांना वाटप करण्यात आले. यावेळी स्वतः गडकरी यांनी कमी वयात चांगले सामाजिक कार्य करत आहात, असे बोलत यश शहा यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गडकरी यांचा गोसेवकांच्या वतीने शेणापासून बनवलेले लक्ष्मी मातेची पावले व गोमातेची मूर्ती भेट देऊन सन्मान केला गेला. यावेळी शहा यांनी गोशाळा संचालकांच्यावतीने गोशाळा अडचणी संदर्भातील निवेदन देण्यात आले.