नगरच्या मार्केट यार्डमध्ये मारहाणीत एकाचा खून; दुकानमालकासह तिघांवर गुन्हा दाखल

0
53

नगर – मार्केट यार्डच्या आवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेल्या वृद्ध महिला व तिच्या वृद्ध भावाला तेथून हुसकावून लावण्यासाठी तिघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यात कुसुम हरिभाऊ कुंभारे (वय ६५, मूळ रा. भिंगार) ही वृद्ध महिला जखमी असून तिचा भाऊ बाळू विठोबा नागपुरे (वय ६०) याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कुंभारे यांच्या जबाबावरून कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंभारे व त्यांचा भाऊ बाळू हे मार्केट यार्डमध्ये बसलेले असताना त्यांच्या बाजूला असलेल्या दुकानाचे मालक व दोन अनोळखी व्यक्तींनी तुम्ही येथे रहायचे नाही, तुम्ही निघून जा, असे म्हणत दोघांना मारहान केली. यात जखमी नागपुरे यांचा मृत्यू झाला. तर कुसुम यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, महिला उपनिरीक्षक शितल मुगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका संशयिताचा शोध सुरू आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. त्यातील फुटेज डिलीट केल्याचे समोर येत असून, ते रिकव्हर करण्यात येत असल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले.