सावेडी उपनगरातील घटना; सात जणांच्या टोळयावर गुन्हा दाखल
नगर – आमच्या भाईला मारतो का, असे म्हणून युवकावर सात जणांच्या टोळीने कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अजय शिवाजी कर्पे (वय २४, रा. सावेडीगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि. ८) दुपारी तीनच्या सुमारास सावेडी उपनगरात भिस्तबाग महाला शेजारी लोकसेवा टी सेंटर समोर ही घटना घडली. जखमी कर्पे यांनी शनिवारी (दि. ९) दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर बाळासाहेब सोमवंशी (पद्मानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी), ओमकार ठोंबरे, अभी तिरंदास (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी), ताहीर मुन्ना शेख (रा. हिंदुत्व चौक, तपोवन रस्ता, सावेडी), जयदीप मते (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पद्मानगर, पाईपलाईन रस्ता, सावेडी), विकास ऊर्फ विकी ढवण (पूर्ण नाव माहिती नाही, रा. वाणीनगर, तागड वस्ती, सावेडी), सोमनाथ गुंजाळ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अजय हे त्यांचे मित्र वैभव संपत बारस्कर यांच्या लोकसेवा टी सेंटर येथे चहा पिण्यासाठी बसलेले असताना तेथे दुचाकीवरून मयुर सोमवंशी व इतर पाच ते सहा जण आले. ओमकार ठोंबरे व अभी तिरंदास रागाने म्हणाले,‘आज्या आमच्या भाईला मारतो का, तु मागच्या वेळेस वाचला आता याला जिवंत सोडू नका कुठे आहे त्याचा मित्र त्याला पण सोडू नका’, असे म्हणून मयुर सोमवंशी याने कोयत्याने अजय यांच्यावर जीव घेणा हल्ला केला. तसेच अभि तिरंदास, ताहीर मुन्ना यांनी मारहाण केली. ओमकार ठोंबरे याने चेंबरची सिंमेटची चौकट उचलून डोयात घालण्याचा प्रयत्न केला. जयदीप मते, विकास ढवण, सोमनाथ गुंजाळ यांनी देखील शिवीगाळ करून जिवंत सोडू नका याला संपवुन टाका, अशी मारण्याची धमकी दिली. दरम्यान आरडाओरडा झाल्याने तेथे लोकांची गर्दी जमा झाली असता ते सर्व जण घटनास्थळावरून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.