महाविकास आघाडीत गठबंधन न झाल्यास ‘बहुजन मुक्ती पार्टी’ सर्वत्र स्वबळावर लढणार

0
60

शिवाजी भोसले यांचे प्रतिपादन; आढावा बैठकीत एकजुटीने पक्षाची शक्ती दाखविण्याचा निर्धार 

नगर – महाविकास आघाडीत गठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे. लोकशाही देशात संविधान धोयात आले असून, संविधानाला बगल देऊन हुकुमशाही पध्दतीने कारभार सुरु आहे. सत्तेसाठी नव्हे, तर बहुजन समाजाला न्याय देवून प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष सुरु असल्याचे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले यांनी केले. बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना भोसले बोलत होते. यावेळी कामगार नेते रावसाहेब काळे पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे सुभाष आल्हाट, इम्पाचे डॉ. भास्कर रणनवरे, बहुजन क्रांती मोर्चाचे यूसुफ शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालिद खान, बेरोजगार मोर्चाचे राहुल पगारे, राष्ट्रीय मूलनिवासी मोर्चाचे नादीर सय्यद, उत्तम पवार, इंजि. संजय शिंदे, राजेंद्र आढाव, शिवाजी कानगुडे, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे अजय देठे, उत्तम पवार, कामगार नेते श्रीधर शेलार, पाऊल भिंगारदिवे, राम कराळे, दत्ता वामन, विनोद साळवे, अतुल कणगरे, रणसिक जाधव, चैतन्य घोरपडे, तात्या वाघ, आशिष खरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रावसाहेब काळे म्हणाले की, देशात बहुजन मुक्ती पार्टीने सर्व प्रथम ईव्हीएम मशीनला विरोध करुन त्याचे धोके निदर्शनास आनले. शेतकरी, कामगार वाचला तर देश वाचणार आहे. लोकप्रतिनिधी आपल्या संस्था वाचवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव नसून, सोयीचे राजकारण केले जात आहे.

लोकसभेच्या निवडणुकीची उमेदवारी दिल्यास निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भास्कर रणवरे म्हणाले की, जनतेच्या प्रश्नावर व राज्यघटना बचावासाठी सर्वांना पुढाकार घ्यावे लागणार आहे. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, खाजगीकरणाचा प्रश्न गंभीर बनत असताना निर्णायक भूमिका घेण्यासाठी त्यांनी आवाहन केले. सुभाष आल्हाट म्हणाले की, जातनिहाय जनगणना होत नसल्याने, बहुजन समाजाला न्याय-हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे ईव्हीएममुळे हुकुमशाही प्रस्थापित होत असताना, नागरिकांनी जागरुक होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तर बहुजन मुक्ती पार्टीची जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने बुथबांधणी झाली असून, स्वबळावर देखील निवडणुक लढण्याची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तर निवडणुकीत एकजुटीने पक्षाची शक्ती दाखविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.