शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा

0
47

नगर – ६ फेब्रुवारी २०२४ रोजी हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या भरती संदर्भात दाखल झालेल्या सर्व रिट याचिका व सर्व अंतिम अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे १६००० शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. हायकोर्टामध्ये सुरू असणार्‍या विविध न्यायालयीन केसेसमुळे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती होऊ शकलेली नाही. मात्र आता शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा व भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.कपिल पाटील यांनी सातत्याने सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षक भारती संघटनेसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे महामंडळाचे शिवाजी खांडेकर यांची या लढ्यात मोठी साथ मिळाली, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली. राज्यातील हजारो शाळांमध्ये एकही शिक्षकेतर कर्मचारी नाही अशी आज अवस्था आहे. शासनामार्फत दररोज नवनवीन माहिती मागविली जाते ही माहिती भरणे, नियमित वेतन देयके तयार करणे, सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तयार करणे, दैनंदिन कार्यालयीन कामकाज आणि अशा प्रकारची अनेक कामे शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने शिक्षकांना करावी लागत आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांनी स्वतः पगार देऊन या रिक्त पदावर शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा बोजा शैक्षणिक संस्थांवर वाढत आहे. शैक्षणिक संस्थातील रिक्त शिक्षकेतर पदावर गेली दहा ते बारा वर्ष कर्मचारी तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. त्यांना नियुक्ती दिनांकांपासून वैयक्तिक मान्यता देण्याची आवश्यकता आहे.

शासन निर्णय २८ जानेवारी २०१९ नुसार सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी रिक्त पदावर विहित प्रक्रिया राबवून शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया सुरू करावयाची आहे. सदर भरती प्रक्रिया करत असताना दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत शिक्षकेतर कर्मचार्‍यांना प्राधान्य द्यावयाचे आहे. कार्यरत शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शैक्षणिक संस्थांनी कार्यरत कर्मचार्‍यांना आकृतीबंधानुसार मंजूर पदांवर पदोन्नती देऊन उर्वरित पदावर नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू करायची आहे. आ. कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटना सदर प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. शैक्षणिक संस्थांना रिक्त पदावर शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदोन्नती अथवा नवनियुक्ती करताना काही अडचणी निर्माण झाल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी किंवा सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ. आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींशी संपर्क साधावा.