हिवतापासाठी लोरोक्वीन कसे देतात?

0
58

हिवतापासाठी लोरोक्वीन कसे देतात?

तुम्हाला ताप आल्यावर कोणीही पटकन म्हणते की “मलेरिया झाला असेल.” मलेरिया वा हिवताप इतका बोकाळला आहे की, कोणताही ताप मलेरिया असू शकतो, असे म्हणता येते. मलेरिया हा एक गंभीर आजार आहे. या आजारात मेंदूवर परिणाम झाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. म्हणूनच वेळेवर उपचार घेण्याची नितांत आवश्यकता असते. हिवतापाचे निदान करण्यासाठी ताप आलेल्या व्यक्तीच्या बोटाचे दोन थेंब रक्त घेऊन त्याची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. या तपासणीत हिवतापाचे जंतू दिसतात. हिवतापाचे निदान झाल्यास उपचार चालू करावे लागतात. यात लोरोक्वीन हे औषध अत्यंत महत्त्वाचे ठरते. हिवताप झालेल्या प्रौढ व्यक्तीला लोरोक्वीन फॉस्फेटच्या (२५० मि.ग्रॅ. च्या गोळीत १५० मि.ग्रॅ. लोरोक्वीन असते) एकूण दहा गोळ्या घ्याव्या लागतात. सुरुवातीला एकदम चार, मग आठ तासांनी दोन, अशा गोळ्या पहिल्या दिवशी देतात. दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी दोन-दोन गोळ्या देतात. हिवतापाच्या प्रकारानुसार प्रायमाक्वीन हे औषधही दिले जाते. लोरोक्वीन उपाशीपोटी देऊ नये. कारण त्यामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, पोटात जळजळ इत्यादी त्रास होऊ शकतो. लोरोक्वीनचा परिणाम न झाल्यास क्वीनीन, मेफ्लोक्वीन, मेटाकेल्फीन अशी औषधे वापरता येतात. हिवतापाचे गांभीर्य लक्षात घेता उपचार पूर्ण घेणे अगत्याचे ठरते, अन्यथा हिवताप परत होऊ शकतो किंवा मेंदूवर विपरीत परिणाम होऊन मृत्यू ओढवू शकतो.