भिंगार परिसरात रस्तालूट करणारा फरार आरोपी पकडला

0
53

अडीच महिन्यांनी घरी आला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

नगर – अडीच महिन्यापूर्वी नगर-पाथर्डी रोडवर भिंगारच्या विजय लाईन चौकात रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वाराला अडवून लुटणार्‍या तिघांपैकी फरार असलेला एक आरोपी फरदिन खलील शेख (वय २१, रा. मुलानगल्ली, भिंगार) याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि.८) राहत्या घराजवळ पकडले आहे. सदर लुटमारीची घटना २२ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे १ च्या सुमारास झाली होती. याबाबत रामेश्वर सुधाकर ढवळे (रा वडगांव बुद्रुक, जि पुणे) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी ढवळे हे मोटारसायकलवरुन विजयलाईन चौकाच्या मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असतांना डी ओ मोपेड गाडीवरील तीन अज्ञात इसमांनी बळजबरीने त्यांच्याकडील २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हिसकावून नेला होता. गुन्हा केल्यापासुन आरोपी फरार होते. भिंगार पोलीस स्टेशनचे स.पो. नि. योगेश राजगुरु यांना शुक्रवारी (दि.८) गोपनिय माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार इसम हा त्याचे राहते घरी येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ एक पथक कारवाईसाठी पाठविले. या पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा लावला असता पोलिसांची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे, समीर शेख, अमोल आव्हाड, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, कांतीलाल चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.