महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या दागिन्यांची चोरी

0
59

नगरमधील बेलेश्वर मंदिर परिसरातील घटना; गुन्हा दाखल

नगर – महाशिवरात्रीनिमित्त नगरच्या भुईकोट किल्ल्यासमोर असलेल्या पुरातन बेलेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठन अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी ६.४५ ते ७.३० या कालावधीत घडली. याबाबत सविता संतोष डोंगरे (रा. वडगाव गुप्ता, ता.नगर, हल्ली रा. सागर अपार्टमेंट, सैनिक नगर, केकती) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी डोंगरे या महाशिवरात्र निमित्त शुक्रवारी (दि.८) सायंकाळी बेलेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिर परिसरात त्यावेळी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. या गर्दीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी डोंगरे यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठन हातचलाखी करत चोरले. दर्शन घेवून बाहेर आल्यावर मिनीगंठन चोरीला गेल्याचे फिर्यादी डोंगरे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.