चाँदबीबी महालाजवळ दाम्पत्याला लुटणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

0
82

एलसीबीच्या पथकाने २ किलोमीटर केला पाठलाग; ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त 

नगर – नगर – पाथर्डी रस्त्यावर चाँदबीबी महालाच्या पायथ्याशी असलेल्या कौडगाव – जांब फाट्याजवळ मोटारसायकलवर चाललेल्या पती पत्नीला लुटून सोन्याचे दागिने व रोकड पळविणार्‍या २ सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव तालुयातील बोधेगांव शिवारात पकडले आहे. पोलिस पथकाने सुमारे २ किलोमीटर थरारक पाठलाग करत या आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, मोबाईल, मोटारसायकल असा ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लहु वृध्देश्वर काळे (वय १९, रा. सोनविहीर, ता. शेवगाव), दिनेश उर्फ बल्याराम अंगद भोसले (वय २२, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) अशी या पकडलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. तर त्यांचे २ अन्य साथीदार विनोद जिजाबा भोसले (रा. चिखली, ता. आष्टी) व कानिफ उध्दव भोसले (रा. वाकी, ता, आष्टी) असे दोघे जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. नगर पाथर्डी रोडवर कौडगाव – जांब फाट्याजवळ दि. १५ जानेवारी रोजी फिर्यादी वैष्णवी संकेत ठाणगे (वय २२, रा. खोजेवाडी, निवडुंगे ता. पाथर्डी, हल्ली रा. तळेगांव रोड, शिक्रापुर) या त्याचे पती सोबत शिक्रापुर येथे मोटार सायकलवरुन जात असताना अनोळखी ३ इसमांनी मोटार सायकलवर पाठीमागुन येवुन १४ हजार ३०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असलेली फिर्यादीचे हातातील पर्स बळजबरीने हिसकावुन चोरुन नेली होती.

सदर बाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना शुक्रवारी (दि.८) पो.नि. दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्हा सराईत गुन्हेगार लहु काळे व त्याच्या साथीदारांनी केलेला असून ते बोधेगाव (ता. शेवगाव) येथे एका सोनाराकडे चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहेत. ही माहिती मिळताच पो.नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार संतोष लोढे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, चंद्रकांत कुसळकर व भरत बुधवंत यांना कारवाईसाठी पाठविले. या पथकाने बोधेगाव येथे जावून सापळा लावला असता दोघे संशयित एका मोटारसायकल वर तेथे आले. मात्र त्यांना पोलिसांची चाहुल लागताच त्यांनी तेथून पळ काढला. पोलिस पथकाने त्यांचा २ किमी पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या कडे ५४ ग्रॅम वजनाचे २ लाख ७० हजार रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, ३० हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल फोन व ८० हजार रुपये किंमतीची युनिकॉर्न मोटार सायकल असा एकुण ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. याबाबत बाबत त्यांचेकडे अधिक विचारपुस करता, त्यांनी नगर व सोलापुर जिल्ह्यात ८ ठिकाणी त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या मार्फत चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. या दोघांनाही पुढील तपासासाठी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.