नगर अर्बन बँकेच्या आणखी एका कर्जदाराला अटक

0
125

नगर – नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी एव्हीआय इंजिनिअरींग कंपनीचे संचालक अविनाश प्रभाकर वैकर (रा. रासने नगर, सावेडी, नगर) याला सोमवारी (दि.४) पहाटे साडेतीन वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली. कर्ज रकमेचा गैरवापर केला. दुसर्‍या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी रक्कम वापरली. यासह दुसर्‍या कर्जदाराच्या खात्यातून वैकर याच्या खात्यात काही रक्कम वर्ग झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वैकर याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैकर याने एव्हीआय इंजिनिअरींग वर्सच्या नावे व्यवसायाकरीता माल खरेदी विक्री, तसेच व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून वेळोवेळी २ कोटी ६७ लाख रुपये कर्ज घेतले.

कर्ज रकमेचा केला गैरवापर; न्यायालयाने सुनावली ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

यातील काही रक्कम दुसर्‍या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रक्कम स्वत:च्या नावे मुदतठेव मध्ये गुंतवणुकीसाठी, काही रक्कम वैयक्तिक खरेदीसाठी व काही रक्कम रोख स्वरुपात काढून कर्ज रकमेचा गैरवापर केला. तसेच, एव्हीआय इंजिनिअरींग वर्सच्या बँक खात्यावर कर्जदार आरोपी व्यंकटेश डेव्हलपर्स यांच्या नावाने मंजूर कर्ज रकमेतून ६९ लाख ६० हजार रुपये वर्ग झाले आहेत. ही रक्कम बँकेच्या एचओबीआयटी खात्यावरुन बँकेचे कर्जदार पन्नालाल बगाडीया यांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये वर्ग झालेल्या रक्कमेतून परत केल्याचे चेकद्वारे दाखवण्यात आले आहे. या सर्व गैरव्यवहाराचा तपास करणे, अपहराची रक्कम हस्तगत करणे यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.