अहमदनगर नावाला विरोध का? प्रशासनाने खुलासा करावा

0
29

नामांतर प्रस्ताव मंजुरीला विरोध करत समाजवादी पार्टीची निदर्शने

नगर – ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. अहमदनगर या नावाला विरोध का? याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा, अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा समाजवादी पार्टीने दिला आहे. ५३४ वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामंतर करू नये व प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नामांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरीत रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांना देण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन, सलीम सहारा, आसिफ रजा, शब्बीर खान, इकराम तांबटकर, पै. अकबर, अल्ताफ लक्कडवाला, आवेज सय्यद, तन्वीर बागवान, समीर शेख, एजाज सहारा, गनी शेख, अश्पाक शेख, तन्वीर सय्यद, समीर शेख, मुबीन सय्यद, जुबेर शेख, अश्फाक शेख उपस्थित होते. २८ मे १४९० साली अहमदनगरची स्थापना झाली. ज्या शहराला ५३४ वर्षाचा प्रदीर्घ असा इतिहास असून, सगळीकडे अहमदनगर शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहराचे नाव क्षणातच बेकायदेशीर रित्या घाईघाईने नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

महापालिका सभागृह विसर्जित असताना एकट्या आयुक्तांनी कोणत्या अधिकाराच्या व कोणत्या कायद्यांतर्गत बेकायदेशीर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. लोकशाहीला काळीमा फासून बेकायदेशीर व मनमानी पध्दतीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचा आरोप समाजवादीच्या वतीने करण्यात आला आहे. ज्या राजाने शहर वसविले, त्या राजाचे नाव शहराला आहे. कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली हा ठराव पारित करण्यात आला. मुळात आरक्षणाची वचनपूर्ती करू न शकल्याने एका समाजाची नाराजी दूर करण्यासाठी असे चुकीचे निर्णय घेऊन लक्ष विचलित करण्यात येत आहे. ज्या शहराच्या नावाला काही ऐतिहासिक वारसा असेल त्या ऐतिहासिक शहराचे नाव बदलता येणार नाही, अशी मार्गदर्शक स्पष्ट सूचना असूनही आयुक्तांनी घाईघाईने बेकायदेशीर प्रस्ताव मंजूर केला. यामागे राजकीय हेतू दडला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.