केडगावात अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीलामृत पारायण व तपपूर्ती सोहळा सुरू
नगर – अत्याधुनिक युगात व धकाधकीच्या जीवनात कोणाकडे वेळ नाही. अशा परिस्थितीत धार्मिक कार्यक्रमांद्वारे समाजाला एकत्र आणून सांस्कृतिक पिढी घडवणं गरजेचं आहे. अशा धर्मसभा मंडपाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचार कुटुंबापर्यंत पोहोचविणे व धार्मिक संस्काराबरोबरच आदर्श पिढी घडविण्याचे काम होईल. सकारात्मक कार्यक्रमांद्वारे सकारात्मक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. केडगावमधील उदयनराजेनगर येथे महाशिवरात्रनिमित्त श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलीलामृत पारायण व तपपूर्ती सोहळ्याचे उद्घाटन सुरेखाताई कोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संपत बारस्कर, माणिक विधाते, महापालिका स्थायीचे माजी सभापती गणेश कवडे, मनोज कोतकर, माजी नगरसेविका सविता कराळे, लताताई शेळके, जालिंदर कोतकर, शकुंतला पवार, लता सातपुते, भूषण गुंड, सचिन सातपुते, गणेश सातपुते, सागर सातपुते, संतोष उरमुडे, हभप नवसुपेमहाराज यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले की, मागील १२ वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यात्मिक धार्मिक विचार हे कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे काम होत आहे. कुटुंबाची प्रमुख महिला असते. महिलांचा धार्मिक कार्यक्रमात मोलाचा वाटा असतो.
पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती जास्त असते. त्यांच्या माध्यमातून संस्कारमय पिढी जोपासली जाते. भानुदास कोतकर व संदीप कोतकर यांनी केलेल्या विकासाच्या माध्यमातून सगळ्यात मोठे उपनगर म्हणून केडगावची ओळख असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते म्हणाले की, प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील १२ वर्षापासून अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. यंदाचे १२ वर्ष असून, तपपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले. सप्ताहांतर्गत हभप नीलेशमहाराज कोरडे, भागवताचार्य हभप महेशमहाराज मडके, हभप कल्याणमहाराज काळे, हभप शंकरमहाराज गणगे, गणेशमहाराज शिंदे, हभप चैतन्यमहाराज वाडेकर, हभप हरिदासमहाराज पालवे शास्त्री व भागवताचार्य हभप समाधानमहाराज शर्मा यांच्या काल्याच्या कीर्तनाने ९ मार्चला सप्ताहाचा समारोप होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गणेश कवडे, मनोज कोतकर, संपत बारस्कर, हभप नवसुपेमहाराज यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष उरमुडे यांनी केले. सूत्रसंचालन अमित रासकर यांनी केले, तर आभार सागर सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन गोरक्ष कोकाटे व मच्छिंद्र भामरे यांनी केले.