तब्बल २१ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी पोलिसांकडून जेरबंद

0
167

नगर व राहुरी तालुक्यात घरफोड्या केल्याची दिली कबुली

नगर – राहुरी, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणारा व तब्बल २१ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाथर्डी बस स्थानक परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. तुषार हबाजी भोसले (वय २३, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. त्याने नगर तालुका व राहुरी पोलीस ठाणे हद्दीत साथीदार राम चव्हाण (रा. आष्टी) याच्यासह घरफोडी केल्याची कबूली दिली. दरम्यान राम चव्हाण हा पसार झाला आहे. भोसले याच्याकडून २ लाख ४० हजार रूपये किमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

नगर तालुयातील चिचोंडी पाटील येथील अजय विठ्ठल कोकाटे यांचे घरफोडून १ लाख ६२ हजाराचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी कोकाटे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह इतर घरफोडी गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रवींद्र कर्डिले, मच्छिंद्र बर्डे, अमोल कोतकर, सागर ससाणे, भाऊसाहेब काळे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त केले होते. या पथकाने तांत्रिक तपासातून भोसले याचे नाव निष्पन्न केले. तो चोरीचे सोने विक्री करण्यासाठी पाथर्डी येथे येताच त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.