शहर परिसरात तलवार, कोयता घेवून फिरत केली दहशत

0
43

कोतवाली व एमआयडीसी पोलिसांकडून दोघांवर कारवाई

नगर – नगर शहर परिसरात हातात धारदार तलवार, कोयता घेवून फिरत दहशत निर्माण करणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. एकाला कोतवाली पोलिसांनी तर एकाला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या दोन्ही कारवाया गुरुवारी (दि.२९) दुपारी व रात्री करण्यात आल्या आहेत. करण कृष्णा फसले (वय ३०, रा. संगम चौक, खिस्त गल्ली) व एमआयडीसी परिसरातील एका १७ वर्षाच्या मुलाचा यात समावेश आहे. एमआयडीसी परिसरातील जिमखाना मैदानावर एक युवक हातात कोयता घेवून दहशत निर्माण करत फिरत असल्याची माहिती स.पो.नि. माणिक चौधरी यांना गुरुवारी (दि.२९) दुपारी मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी पाठविले. या पथकाने तातडीने जिमखाना मैदानात जावून एका १७ वर्षीय युवकाला पकडले. त्याच्याकडून एक कोयता हस्तगत करण्यात आला असून, त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा ४/२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (३) (१) ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दुसरी कारवाई कोतवाली पोलिसांनी संगम चौक, खिस्त गल्ली येथे रात्री ११ च्या सुमारस केली. या ठिकाणी करण कृष्णा फसले हा युवक हातात धारदार तलवार घेवून फिरत असून आरडाओरडा करत दहशत निर्माण करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने तेथे धाव घेत त्याला पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.