जातीय तेढ निर्माण करून भांडणाची मजा बघणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा

0
41

तोफखाना पोलिस ठाणे परिसरातील भांडणाची चौकशी करा

नगर – शहरातील वस्त्याय्वस्त्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करणार्‍या व वारंवार भांडणे लावून देऊन मजा बघत बसणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच तोफखाना पोलिस ठाण्याच्या परिसरात २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात उडाणशिवे यांनी म्हटले आहे की, मी ५० वर्षापासून रामवाडी झोपडपट्टीत राहत आहे. याच भागात सामाजिक काम करत १५ वर्षे नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. झोपडपट्टीवासियांचे नागरी प्रश्नासह झोपडपट्टी बचाव कृती समितीचे तसेच कचरा वेचक संघटनेचेही काम करत आहे. हे काम करताना कधीही भेदभाव केलेला नव्हता व नाही. परंतु चार ते पाच वर्षांच्या कालावधीमध्ये या भागात भांडणे, दंगली, सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. रामवाडीमध्ये अत्यंत गरीब लोक राहत असून मोलमजुरी करुन उदरनिर्वाह भागवित आहेत. परंतु अशा वस्त्यांमध्ये काही विघ्नसंतोषी लोक विष पेरण्याचे काम करत आहेत. रामवाडीकरांनी एकत्र येवून जातीय सलोखा निर्माण केलेला होता. परंतु पुन्हा काही मोजया मंडळींना ते सहन झाले नाही. म्हणून २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान दोन गटातील किरकोळ भांडणाचे रुपांतर मोठ्या भांडणात करुन वाद पेटविण्याचे काम केले. त्याचाच भाग म्हणून माझा मुलगा विकास उडाणशिवे व त्याची टोळी यांनी जबर मारहाण केल्याचे सोशल मिडीयाद्वारे लोकल न्यूज चॅनेलला बातमी देत पुन्हा वाद पेटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केला आहे.

माझ्या मुलाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही सदरची मारहाण त्याने केल्याचे भासवत आहेत. २० फेब्रुवारी रोजी रामवाडी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार, सामाजिक न्याय विभाग आयोजित कार्यकर्ता व झोपडपट्टीवासियांचा मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याची पूर्व तयारी म्हणून विकास उडाणशिवे रामवाडी चौकामध्ये बॅनर चिटकविण्याचे काम करत होता. त्यामुळे ज्या ठिकाणी भांडण झाले त्या ठिकाणी माझा मुलगा विकास तसेच माझा नातू तेजस हे हजर नव्हते. उलट ते रामवाडी चौकात कार्यक्रमाच्या तयारीचे काम करत होते. त्याबाबतची सत्यता पडताळणीसाठी सी. सी. टी. व्ही. कॅमेराचे फुटेज पाहू शकता. माझे कुटुंब सतत सामाजिक कामामध्ये सहभागी होत असते. समाजात मला मान व प्रतिष्ठा आहे. माझ्या कुटुंबाला या प्रकरणात अडकविण्याचा हा एक कुटील राजकीय डाव आहे. सदर सोशल मिडीयाद्वारे माझ्या कुटुंबाचा या प्रकरणात हात असल्याचे बनावट पध्दतीने दाखवून माझी समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.