सेवानिवृत एसटी कामगारांनी फूंकले राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग

0
74

नगर – सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्नावर शहरात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (महाराष्ट्र) अहमदनगर शाखेचा जिल्हा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून राज्याचे पदाधिकारी यांनी सेवानिवृत्तांची थकित देयके मिळण्यासाठी अहमदनगर येथून राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. एसटी महामंडळाला थकित देयके अदा करण्यासाठी एप्रिल पर्यंतचे अल्टीमेटम देवून १ मे कामगार दिनापासून राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नगर-पुणे महामार्गावरील स्वस्तिक चौकातील अक्षदा हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस सदानंद विचारे, कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड, संघटक सचिव प्रभाकर अंबेकर, कोषाध्यक्ष गणेश वायफळकर, संयुक्त सचिव पांडुरंग जाधव, प्रादेशिक सचिव धनंजय चतुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदानंद विचारे यांनी अहमदनगर जिल्ह्याला स्वातंत्र्य व कामगार चळवळीचा मोठा इतिहास आहे. या जिल्ह्यातून सेवानिवृत एसटी कामगारांच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येत आहे. सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रश्न बिकट बनले असून, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असून, एसटी महामंडळाने त्यांचे प्रश्न गांभीर्याने घेऊन तात्काळ सोडविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर राज्यातील पदाधिकारी यांनी सेवानिवृत एसटी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करुन संघटनेचे राज्य पातळीवर सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली.

या मेळाव्यास आमदार निलेश लंके यांनी भेट देवून एसटी कर्मचार्‍यांच्या विधवा पत्नी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्याच्या पत्नींना सर्व बसच्या मोफत पास मिळण्यासाठी स्वतः परिवहन मंत्री यांच्याबरोबर चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले. जिल्हा संघटनेच्या वतीने दिनकरराव लिपाणे पाटील, साहेबराव चौधरी, दिलीपराव पठाडे, सुनील कोल्हे यांनी स्थानिक पातळीवरचे प्रश्न मांडून जिल्ह्यात सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष बलभिम कुबडे म्हणाले की, सेवानिवृत्त एसटी कामगारांच्या चेहर्‍यावर आनंद व समाधान निर्माण करण्याच्या उद्देशाने संघटनेचे कार्य सुरु आहे. प्रलंबीत प्रश्न सुटण्यासाठी सर्वांनी एकजुट होण्याची गरज आहे. थकित रकमा मिळण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असून, या आंदोलनात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. या मेळाव्यात पारनेर आगारातील ९२ वर्षीय ज्येष्ठ चालक गिरीधर गाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. तर सेवानिवृत एसटी कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त सेवानिवृत एसटी कामगार सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले. आभार मच्छिंद्र शिंदे यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी असरुबा खेडकर, एकनाथ औटी, कैलास प्रभुणे, गंगा कोतकर, ताकपिरे व त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.