नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी आणखी दोघांना अटक

0
40

सीए शंकर अंदानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नगर – नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.२०) आणखी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया (रा. सारसनगर) व कर्जदार प्रवीण सुरेश लहारे (रा. केडगाव) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान मागील बुधवारी अटक केलेला सीए शंकर घनशामदास अंदानी याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणात संशयितांना अटक करण्याचा धडका सुरू झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. अलिकडच्या काळात बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुणिया यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या चौकशीतून घोटाळ्यातील नवनवीन खुलासे समोर आले आहे.

दरम्यान बँकेचा मुख्य कर्ज तपासणी अधिकारी फिरोदिया हा मंगळवारी बँकेच्या मुख्य शाळेत आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला तेथून ताब्यात घेत अटक केली आहे. बँकेकडे येणार्या कर्जप्रकरणाच्या फाईलची तपासणी करून कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे कामे तो करत होता. त्याच्याकडे पोलीस चौकशी करणार आहेत. तसेच लहारे एंटरप्रायजेसचा प्रवीण लहारे हा केडगाव उपनगरात असताना त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. त्याने बनावट कागदपत्रे तयार करून एकाच दिवसात अडीच कोटीचे कर्ज घेतले असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्याच्याकडेही पोलीस चौकशी करणार आहे.