सोशल मिडीयावर प्रसारित केला वादग्रस्त रिल व्हिडिओ

0
52

भिंगार येथील प्रकार; दोघा जणांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नगर – आरक्षण आंदोलनाबाबत वादग्रस्त व्हिडिओ रील बनवून तो सोशल मिडीयावर प्रसारित केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२०) सायंकाळी भिंगार येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा युवकांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत राजेश छगन काळे (बालाजी कॉलनी, माधवबाग, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळे हे सकल मराठा समाज चळवळीत काम करतात, त्यांनी या नावाने एक व्हाटस अप ग्रुपही केलेला आहे. या ग्रुपमध्ये एका मोबाईल नंबर वरून वादग्रस्त व्हिडिओ रील टाकण्यात आला. त्यामुळे भिंगारमधील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जावून स.पो.नि. योगेश राजगुरू यांची भेट घेत सकल मराठा समाजाच्या भावना दुखावणार्‍या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर पोलिसांनी वादग्रस्त व्हिडिओ रील तयार करणार्‍या आणि तो प्रसारित करणार्‍या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर भा.दं.वि.कलम ३४, ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.