नगर – अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खरीप हंगाम २०२२ मधील पीक नुकसानीचे पैसे देण्यास शासन विसरले आहे काय ? असा सवाल भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केला आहे. गतवर्षी खरीप हंगामामध्ये अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, कांदा, फुलशेती व फळबागांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचप्रमाणे शासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. तसेच तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर समोर जागरण आंदोलन करण्यात आले होते.
शासनाकडून नेहमी पीक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे उत्तर येते. मात्र अद्यापही सर्व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. उदाहरणादाखल मौजे चिचोंडी पाटील येथील १७३४ शेतकर्यांचे पीक नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. मात्र अद्याप सुमारे ८०० शेतकर्यांचे पैसे प्राप्त झालेले नाही. हा प्रकार संपूर्ण नगर जिल्ह्यात घडलेला आहे. यावर्षी कमी पावसामुळे कोरडा दुष्काळ पडलेला आहे अशा वेळेस शासनाने मागील वर्षाचे व या वर्षाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जेष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी, राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, वीर बहादुर प्रजापती, अशोकबापू कोकाटे, कैलास खांदवे, बबलू खोसला, विलास खांदवे, रईस शेख, गणेश इंगळे, सुनील टाक व सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे.