महापालिकेच्या नियोजनाअभावी नागरिक सोसताहेत ‘नरक यातना’

0
80

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून रस्त्यावरून वाहतेय ‘मैलामिश्रित पाणी’

नगर – प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या नियोजनशून्य प्रशासकीय कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरी सुविधांबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील महिनाभरापासून जिल्हाधिकारी जुन्या कार्यालयासमोर ड्रेनेजचे मैलामिश्रित घाण पाणी वाहत असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्याचबरोबर या रस्त्याने प्रवास करणार्‍या पादचारी, दुचाकीधारक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेची सर्व प्रशासकीय सूत्रे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. प्रशासकांच्या काळात महापालिकेच्या कारभारात सुधारणा होऊन नागरी समस्या तात्काळ सुटतील अशी अपेक्षा नगरकरांना होती. तथापि ती फोल ठरत असल्याचे वारंवार दिसून येते. कचरा, अस्वच्छता, ड्रेनेज लाईन, रस्ते हे आहे. सदरचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचल्यानंतर त्यातून वाहन गेल्यानंतर ते प्रश्न कायम ‘आ’ वासून उभे असून, त्याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणतेही ठोस नियोजन असल्याचे दिसत नाही. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जाणार्‍या रस्त्यावर मागील महिनाभरापासून ड्रेनेज तुंबून मैलामिश्रित घाण पाणी वाहत जवळील माणसांच्या अंगावर उडते. त्यातून वादविवादाचे प्रसंग घडतात. घाण पाण्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. तब्बल महिनाभरापासून या घाण पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून, स्थानिक दुकानदार, व्यावसायिकांसह येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. प्रशासन वसुलीसाठी थेट नागरिकांच्या घरा- दारासमोर येते. मात्र नागरी समस्या सांगितल्या की तोंड फिरवते अशी अवस्था आज प्रशासनाची आहे. वसुलीसाठी कारवाईची भूमिका घेणार्‍या प्रशासकीय यंत्रणेने नागरी समस्यांबाबतही कटाक्षाने दखल घेतली तर नागरिकांची अशा नरकयातनेतून नक्कीच सुटका होऊ शकेल.