चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळासह मुंबईत पार पडली बैठक
नगर – चर्मकार समाजाच्या विविध प्रलंबीत प्रश्नासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्मकार समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मकता दाखवून संबंधित अधिकारी वर्गाला प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडलेल्या बैठकीप्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे, महिला प्रदेश कार्याध्यक्ष पूजा कांबळे, वसंतराव धाडवे, सामाजिक न्याय विभागाचे सेक्रेटरी सुमंत भांगे, चर्मोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती, बार्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच संबंधित प्रशासनातील अधिकारी समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते. संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीची शासकीय सुट्टी जाहीर करावी, चर्मउद्योग महामंडळाचे सर्व थकीत कर्ज बिनशर्त माफ करावे, कर्जाचे जाचक अटी रद्द करुन सरळ पद्धतीने देण्यात यावे, संत गुरु रविदास महाराज यांचे विश्व विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यात यावे, गटई कामगारांना महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत स्तरावर पीच परवाना व अपघात आरोग्य विमा देण्यात यावा, देवनार मुंबई येथील महामंडळाच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक लेदर हब, लस्टर व प्रशिक्षण व जागतिक दर्जाचे विक्री केंद्र आणि होस्टेल उभारण्यात यावे, बांद्रा (मुंबई) येथील एकमेव चर्मकला महाविद्यालय पूर्ववत करून लेदर इंजिनिअरिंग पदवी व इतर लेदर कोर्सेस सुरू करण्यात यावे, चर्मउद्योग महामंडळ तसेच चर्मकार कल्याण आयोग यांचे अध्यक्ष व संचालक मंडळ तात्काळ नियुक्त करण्यात यावे, चर्मोद्योग महामंडळ यांच्यामार्फत विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात यावे, चर्मउद्योग महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्ताने मुंबई येथे संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करताना राष्ट्रीय चर्मउद्योग प्रदर्शन व चर्मकार समाजाचा विकास मेळावा तसेच मागील चार वर्षाचे संत रविदास महाराज पुरस्कार वितरण समारंभ घेण्याची मागणी करुन सदर विषयावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली. समाजाच्या विविध विकास, न्यायहक्क आणि सन्मानाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन स्तरावर सदरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असून, चर्मकार समाजातील विविध प्रश्न व अडचणीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले.