निखिल वागळेंच्या ‘निर्भय बनो’ सभेचे २० फेब्रुवारीला नगर शहरात आयोजन

0
49

नगर – नगर शहरात २० फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वा. माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन येथे पत्रकार निखिल वागळे यांची निर्भय बनोच्या जाहीर सभा होणार आहे. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सभा आयोजना बाबतची माहिती अहमदनगर लोकशाही बचाव मंचाचे कार्यकर्ते किरण काळे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, दीपक ससाणे, इंजि. सुजित क्षेत्रे, देवराम शिंदे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला आदींनी दिली आहे. संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले. सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शिवूरकर (संगमनेर) देखील सभेला संबोधित करणार आहेत. देशात आणि राज्यात हुकुमशाही पद्धतीने सरकार काम करत आहे. निवडणूक आयोग, ईडी, इन्कम टॅस, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा राजकीय हेतूने गैरवापर सुरू आहे. बेरोजगारी, महागाई, धार्मिक, जातीय तेढ यामुळे जनता त्रस्त आहे. शेतकरी, कामगार, लघु उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता सर्वच देशोधडीला लागले आहेत. त्यातच अहमदनगरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुंडगिरी, खून, गोळीबार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, झूंडशाही, लोकशाही विचार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले अशा हिंसक घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मात्र नाहक होरपळून निघत आहे. हुकुमशाहीला विरोध आणि लोकशाही वाचविण्यासाठीचा लढा जन सहभागाने पुढे नेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आल्याचे मंचाने म्हटले आहे. डॉटर, वकील, आर्किटेट, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, पत्रकार, उद्योजक, व्यापारी, साहित्य, कला, संगीत, कामगार, कष्टकरी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकातील नगरकर सभेला उपस्थित असणार आहेत. विचार मंचाचे विचार ऐकण्यासाठी सभा सर्वांसाठी खुली आहे. सभेला नगरकरांनी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांच्या वतीने हेल्पलाईन मोबाईल क्रमांक ९९२२९१४२६४ उपलब्ध करून देण्यात आला आहे.