चांदीच्या वस्तूला ‘सोन्याचा मुलामा’ देत सराफ व्यावसायिकाची केली फसवणूक

0
29

नगर – चांदीच्या वस्तूला सोन्याचा मुलामा देवून ती सोन्याची असल्याची भासवून केडगावातील सराफ व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक मुकेश मधुकर दहीवाळ (वय ४२ रा. सचिननगर, केडगाव) यांनी मंगळवारी (दि. १३) दिलेल्या फिर्यादी वरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद गोपा व मुकेश गोपा (पूर्ण नाव माहिती नाही, रा. राजस्थान) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीवाळ यांचे केडगाव उपनगरात शाहूनगर बस स्थानकाजवळ बालाजी सराफ नावाचे दुकान आहे. २ फेब्रुवारी रोजी प्रमोद व मुकेश एक अंगठी घेऊन आले व ती मोडायचो आहे, असे दहोवाळ यांना सांगितले. त्यांनी बिल घेऊन येण्यास सांगितले असता ते दोघे सोमवारी (दि. १२) सायंकाळी बिल घेऊन दुकानात आले. त्यावेळी त्यांच्याकडे अंगठी व पेंडलचे बिल होते. त्यांनी दहीबाळ यांना तीन सोन्याचे पेंडल दिले. त्याचे ७९ हजार ९०० रुपये होते, असे दहीवाळ यांनी सांगितले असता आम्हाला पैसे नको असून सोन्याची वस्तू द्या, असे ते दोघे म्हणाले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना सोन्याच्या वस्तू करून दिल्या. दरम्यान मंगळवारी (दि. १३) दुपारी तीन पैकी एका पेंडलची हिटर गनने गरम करून तपासणी केली असता ते पांढरे पडू लागले व त्याचे रूपांतर हे चांदीमध्ये झाले. आपली फसवणूक झाल्याचे दहीवाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस गाठूल याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.