महिला दुकानदाराने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर केली कारवाई
नगर – दुकानासमोरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी महिला व्यावसायिकाने थेट आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.१५) शहरातील चितळे रोड येथील अतिक्रमणे हटविली आहेत. या कारवाईत टपर्या हटविण्यात आल्या असून लोखंडी टेबल, लोखंडी पलंग अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले आहेत. शहरातील चितळे रोड येथील दुकान नं.६, साई कॉर्नर, युनियन बँक शेजारील दुकानासमोर अतिक्रमण करण्यात आले होते. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत दुकानदार शुभांगी अरुण ओहोळ यांनी डिसेंबर २०२० पासून महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती. अतिक्रमण विरोधी पथक येणार असल्याची माहिती संबंधित अतिक्रमण धारकांना आधीच मिळत असल्याने सर्व सामान शेजारील बोळीत ठेवून पथक निघून गेल्यानंतर सदरचे सामान पुन्हा दुकानासमोर आणून अतिक्रमण केले जात असल्याचे ओहोळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर अतिक्रमणामुळे दुकानात प्रवेश करण्यास बाधा येते. तसेच पार्किंग करू शकत नाही. संबंधित अतिक्रमण करणारे माझ्या दुकानात येणार्या ग्राहकांशी दारू पिऊन शिवीगाळ आणि वाद घालतात. महिलांवर कमेंटस् करतात. दुकानासमोरील सामान हटविण्यास सांगितल्यास अंगावर धावून येेणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत असल्याचे या महिला दुकानदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची अखेर दखल घेत मनपाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, प्रभाग अधिकारी कोतकर, क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे यांच्या आदेशाने गुरुवारी (दि.१५) चितळे रोडवर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. यावेळी दुकानासमोरील लोखंडी टेबल, पलंग टाकून हळदी-कुंकू, पुजेचे साहित्य विकणार्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. टपर्या हटवून इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.