शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेत सुधारणा करा अन्यथा रस्त्यावर उतरणार

0
102

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगर – नगर शहरात खून, दहशत, लूटमार, तांबेमारी, खुनी हल्ले, रस्ता लुट, दरोडे, बलात्कार, विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालेले आहेत. या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे का? की तुमचे कर्मचारी हप्ते खाऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली छूट देत आहेत का? हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. याप्रसंगी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, परेश लोखंडे, प्रा.अंबादास शिंदे, अरुण झेंडे, संदिप दातरंगे, पप्पू भाले, गौरव ढोणे, महेश शेळके, ज्येम्स आल्हाट, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, डॉ. श्रीकांत चेमटे, उमेश काळे, अनंत राठोड आदिंसह जोशी परिवार उपस्थित होता. निवेदनात म्हटले आहे, नगरमध्ये बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांना मारहाण झाली. त्यांच्यावर रात्रीच्या अंधारात जीवघेणा हल्ला करण्यात आला. आता ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात नगरमध्ये राहुरी तालुयात अ‍ॅड. आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून करण्यात आला. हे प्रकरण राज्यभर गाजते आहे. नगरच्या ताबेमारी आणि जीवघेण्या हल्ल्यात सराईत सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेतला आणि कसाही नंगा नाच केला तरी चालतो का?…… ओला साहेब आपण विधी पदवीधर आणि सनदी पोलीस अधिकारी होण्याअगोदर सनदी न्यायाधीश होता. सामान्य माणसाला न्यायदान कार्य आपण केले आहे. आणि आता त्याच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी आपल्यावर असताना, आपल्या हाताखालील अधिकारी आणि कर्मचारी अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने गुन्हेगारांचे फावते आहे.

आज सामान्य माणूस, गोरगरीब, व्यापारी, उद्योजक आणि मालमत्ताधारक नगरमध्ये जीव मुठीत धरून वावरत आहे. मध्यंतरी नेता सुभाष चौकातीन गुगळे नावाचे व्यावसायिक यांना सारसनगर भागात मारहाण झाली. रस्ता लूट करणार्‍या चोरट्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटले. त्याअगोदर दोन जणांना पाईपलाईन रोड भिस्तबाग महाल येथे अशीच लूटमार झाली. बन्सी महाराज मिठाईचे मालक श्री.जोशी यांना मारहाण झालेल्या ठिकाणी तर गावठी कट्टा आणि तलवार पोलिसांना सापडली. या घटनांची नोंद आपल्या पोलीस ठाण्यात नियमितपणे होते. परंतु तपास पुढे जात नाही. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काहीच कारवाई करीत नसल्याने गुन्हेगारांचे फावते. नुकतेच एका शिक्षण संस्थेच्या प्राध्यापकाने आपल्या केबिनमध्ये भूगोलाच्या प्रॅटिकल परीक्षेचे २० पैकी २० मार्क देण्याचे अमिष दाखवून विद्यार्थिनीचा विनयभंग केला. स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील दिवसागणिक वाढ होते आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे भयच राहिलेले नाही, अशी आजची स्थिती आहे. या घटनांमुळे नगरचे नाव बदनाम होत चालले आहे. या बिघडत चाललेल्या कायदा सुव्यस्थेबाबत आपण स्वत: लक्ष घालून यात सुधारणा कराल असे अपेक्षित आहे. असे न झाल्यास शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागेल, अशा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.