अहमदनगर सीए शाखेला पुरस्कार प्रदान

0
69

नगर – द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया यांच्या वतीने नुकताच ७४ वा वार्षिक समारंभ पार पडला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या शानदार समारंभात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते अहमदनगर सीए सभासद शाखेला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार व सीए विद्यार्थी शाखेला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीए नगर शाखेच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे व संपूर्ण कमिटीने हा पुरस्कार स्वीकारला. तर सीए विद्यार्थी शाखेचा पुरस्कार अध्यक्ष सनित मुथा, प्रसाद पुराणिक व विद्यार्थी शाखेच्या कमिटीने स्वीकारला. सीए सभासद शाखेला आतापर्यंत दुसर्‍यांदा हा पुरस्कार मिळाला आहे तर विद्यार्थी शाखेला सलग दुसर्‍या वर्षी हा पुरस्कार मिळाला आहे. सीए अनिकेत तलाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मागील ७५ वर्षात सीएंनी भारताच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. दरवर्षी बजेटच्या आधी सरकारला विविध क्षेत्रात येणार्‍या अडचणीसंदर्भात सल्ला दिला जातो व त्यामुळे सरकारचे काम सोपे होते. सीए परीक्षा घेण्याच्या पद्धतीबाबत देखील त्यांनी सीए इन्स्टिट्यूटचे कौतुक केले. सीए इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अनिकेत तलाठी यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वर्षभर देशभरात आणि परदेशातील विविध शाखांमध्ये सीए शाखेने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की आपली सीए इन्स्टिट्यूट जगभरातली सर्वात मोठी अकाउंटिंग इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये एकूण ४,००,००० पेक्षा जास्त सीए व ८,५०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. पुढील २५ वर्षात सीए इन्स्टिट्यूटने काय लक्ष ठेवले याबद्दलही त्यांनी भाष्य केले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभय कटारिया, महेश तिवारी, पवन दरक व विद्यार्थी शाखेचे पदाधिकारी पूजा थावरे, स्नेहल पिपाडा, हर्षवर्धन पाटील, आदित्य काळे, वैष्णवी गवळी, राजश्री श्रीगादी, प्रज्ञा नागपुरे इ. उपस्थित होते.