व्यावसायिकावरील हल्ल्‌याचे कारणही समजेना अन्‌ आरोपींचा सुगावाही लागेना

0
40

स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांच्या पथकांकडून घेतला जातोय शोध

नगर – येथील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय ५४, रा. किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहोर रस्ता, सावेडी) यांच्यावर शनिवारी (दि.१०) रात्री जीवघेणा हल्ला करणार्या दोन अनोळखी व्यक्तीविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी जोशी यांनी रूग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांना जबाब दिला आहे. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला करणारे अद्यापही पोलिसांना हाती लागले नसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तोफखाना पोलीस त्यांचा शोध घेत आहे. दिलेल्या फिर्यादीत हल्ल्याचे कारण नमूद करण्यात आलेले नाही. हल्ला करणार्‍यांना अटक केल्यानंतरच त्यामागील कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. धीरज जोशी यांचे नगर शहरातील रामचंद्र खुंट येथे बन्सी महाराज मिठाई नावाचे दुकान आहे. ते दुकान त्यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बंद केले व दुचाकीवरून घराकडे येण्यासाठी निघाले. रामचंद्र खुंट- कोठला स्टॅन्ड, डीएसपी चौक- तारकपूर- मिस्कीन मळा- तोफखाना पोलीस ठाणे मार्गे प्रोफेसर कॉलनी चौकात ते आले. तेथे थोडा वेळ थांबल्यानंतर कुष्ठधाम चौक मार्गे गुलमोहोर रस्त्याने त्यांच्या किर्लोस्कर कॉलनीत आले असता त्यांना त्यांची मुलगी पाळीव श्वानाला घेऊन फिरताना दिसली. धीरज तिच्या जवळ थांबले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धीरज यांना शिवीगाळ केले. एकाच्या हातात तलवार व दुसर्‍याच्या हातात काहीतरी हत्यार होते. त्यांनी धीरज यांची गचांडी पकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात धीरज यांच्या दोन्ही हाताला मार लागून ते जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर हत्यार टाकून पसार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान धीरज यांच्यावर कोणत्या कारणातून हल्ला झाला, याचा उल्लेख फिर्यादीत नसून हल्ला करणार्‍यांना अटक केल्यानंतर त्यामागील कारण समोर येणार आहे.