विचारी अमोल

0
67

विचारी अमोल

काळा, बावळा वाटणारा, रोजचेच पण स्वच्छ कपडे घातलेला अमोल खुषीत होता. आज त्याला मोठ्या पाहुण्याच्या हस्ते खूप बक्षिसे मिळणार होती. त्या रकमेत आठवीची पुस्तकं, वह्या, फी सारा खर्च भागेल का याचा विचार करीत चालताना तो केव्हा पोचला, त्याचं त्यालाच कळलं नाही. मित्रांबरोबर सभास्थानी जात असताना शिक्षकांनी त्याला बक्षिसे घेणार्‍या मुलांच्या गटात नेऊन बसविलं. समारंभ सुरू झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यंदा बक्षिसं देण्यासाठी मगनशेठनी मोठी रक्कम दिल्याचं जाहीर केलं. त्याचं औदार्य, व्यवसाय, सगळं सांगितले. मुलांची चुळबूळ सुरू झाली. म्हणून आवरतं घेतलं. बक्षिसांची यादी वाचली जाऊ लागली. मुलं क्रमाने बक्षीस घेऊ लागली. अमोलचं नाव पुकारलं गेलं. त्याला सर्वोत्तम विद्यार्थ्याला मिळणार्‍या बक्षीसासह ५-६ बक्षिसे मिळाल्याचं सांगितलं अमोल व्यासपीठाकडे जाऊ लागला. मित्रांच्या टाळ्या सुरू झाल्या. पाहुण्यांकडून बक्षीस स्वीकारण्यासाठी हात पुढे न करता ध्वनिवर्धक पुढे ओढला. म्हणाला, “ही सर्व बक्षिसं मिळाल्यानं मला खूप आनंद झालयं. पण. मगनशेठनी पैसा मिळविलाय ‘गुटखा’ विकून. त्यांच्या मुलानं माझा मित्र सुहासच्या भावाला गुटख्याची सवय लावली. जिभेचा कर्करोग झाला त्याला. त्यातच तो गेला. गुटखा वाईट असतो. मुलांना त्याची सवय लावणारे, तो उपलब्ध करून देणारे वाईट असतात. गुटख्यावर मिळविलेल्या पैशाचं बक्षीस मी स्वीकारू शकत नाही. मला माफ करा.” सगळे स्तब्ध झाले. अमोल परतला. पण पाहुण्यांनी त्याला परत बोलावले. शाबासकी दिली. ‘अमोल हिरा’ असं संबोधून त्यांनी स्वतःच्या खिशातून ५०० रुपये बक्षीस दिले.

तात्पर्य : मुलांना, ‘अमोलसारखे विचारी व्हा’ असा संदेश दिला. टाळ्यांच्या गजरात मुलांनी सद्विचारी होऊ असे आश्वासन दिले.