उलटी का होते?

0
52

उलटी का होते?

उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते; हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की, मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यांमुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते. खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूंवर दाब येऊन उलट्या होतात. ही उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीने बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी-जुलाब होतच राहिले तर मीठ, साखरपाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या-जुलाब होत असतील, तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास; उलटीत रक्त किंवा लाल, काळा करडा रंग दिसल्यास; उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मान ताठरणे अशी लक्षणे असल्यास रुग्णास ताबडतोब डॉटरांकडे न्यावे