महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात

0
15

आमदार संग्राम जगताप यांनी केली मध्यरात्री कामाची पाहणी

नगर – नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते चांदबिबी महालापर्यंतच्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून खड्डे झाले असून नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले आहे. यासंदर्भात आ. संग्राम जगताप यांच्या निवेदनाची दखल घेत राष्ट्रीय महामार्गावरील स्टेट बँक चौक ते चांदबिबी महालापर्यंतच्या खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. त्या कामाची आ. संग्राम जगताप यांनी रात्री उशिरा १ वाजता ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्री. तारडे उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने छोटे-मोठे अपघात होऊन काहीजण दररोज जखमी होत असून तर अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या एक महिन्यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आ. संग्राम जगताप यांनी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली होती. अन्यथा १० फेब्रुवारी रोजी स्टेट बँक चौक येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता तारडे यांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश येत आंदोलनाच्या आधीच खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे.