नाथपंथी साधूंची श्री विशाल गणेश मंदिरास भेट
नगर – देवस्थान ही आपल्या संस्कृतीचे प्रेरणास्थान आहे, प्रत्येक देवस्थानची किर्ती आणि महंती ही सर्वदूर पोहचविणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. या मंदिरातून आपली धार्मिकता जोपासली जाणे गरजेचे आहे. नाथ संप्रदाय हा देशभर पसरलेला आहे. आज श्री विशाल गणेशाचे दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. मंदिराचा जिर्णोद्धार व सुशोभिकरण हे नेत्रदिपक असेच आहे. त्यातून भाविक-भक्तांना प्रेरणा मिळत आहे. देशभर भ्रमण करतांना या मंदिरांची महंती आम्ही सर्वांपर्यंत पोहचूव असे महंत समुंदरनाथजी महाराज यांनी सांगितले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे अखिल भारतीय योगी महासभेचे महंत समुंदरनाथजी महाराज, सोनारी भैरवनाथ मठाचे शामनाथजी महाराज, कलकत्ता येथील सिंगनाथजी महाराज, आळंदी मठाचे प्रमुख तेजनाथजी महाराज, भगवाननाथजी महाराज आदिंसह नाथपंथी साधूंनी भेट दिली. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज व श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी संगमनाथ महाराज यांनी सर्व नाथपंथी साधूंचे आदरतिथ्य केले.